कोरोना काळामधील आपण आणि समाज जीवन
२०२० सुरू होताच संपूूर्ण जगाला कोरोनाची चाहूल लागली होती.
भारतात ही जानेवारी अखेरीस पहिला रुग्ण मिळाला होता.परंतु त्या वेळेस जनताच काय पण सरकार देखील गंभीर नव्हती.त्याचेच उदाहरण म्हणजे 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम.लोकडाऊन,सॅनिटायझर,कोरंटाईन या शब्दांची ओळख होता-होता मार्च उजाडला आणि जाहीर करण्यात आला लोकडाऊन; जनता कर्फ्यू या नावाने.सुरवातीला सर्वांनाच वाटले होते(सरकारला सुद्धा) की २१ दिवसात कोरोना आटोक्यात येईल म्हणून तेव्हड्या दिवसाची कळ जनतेनी कशीतरी सोसत काढली.पण रुग्णवाढ काही थांबत नव्हती आणि लोकडाऊन देखील.
लोकडाऊन मध्ये चांगल्या-वाईट गोष्टींचा अनुभव प्रत्येकाला आला आणि बऱ्याच गोष्टी बघायला सुद्धा मिळाल्या.एकीकडे वायू,ध्वनी प्रदूषण रहित निर्मनुष्य रस्ते,शहरे,स्वच्छ नितळ वाहणाऱ्या नद्या,शहरातल्या मानवी वस्तीत वावरणारे पक्षी,प्राणी तर दुसरीकडे उन्हामध्ये पाई चालणारे मजूर परिवार,पाई जाताना झालेल्या अपघातात किंवा उपासमारीने मरण पावलेली माणसे होती.या काळात थोडे फार हाल झाले नाही असा कुणीही नसेल.भाजीपाला व किराणा साठी मिळणारी 144 उसंत हवीशी वाटत होती.पण तीही नियमबद्ध चौकटीतील असल्यामुळे आणि सवय नसल्याने त्रासदायकच वाटायची.लागू झालेल्या नियमावली पैकी पूर्वाश्रमीचा कुठलाही अनुभव नसल्यामुळे गडबड होणे स्वाभाविक होते.नकोसा वाटणारा 'मास्क' हळूहळू आपला 'बॉडीगार्ड'वाटू लागला.बाहेरून आल्यावर हात धुवायचे राहिले तर स्वतःलाच 'दोषी' भावना यायला लागली.याकाळात टीव्ही,मोबाईल नसता तर?अशे प्रश्न स्वतःलाच पडू लागले.किराण्याचेही आपले वेगळेच किस्से.दुकानातील गर्दीला न जुमानता काहींनी सुरवातीला अशी काही रसद जमा केली त्याच्यात आता त्यांची दिवाळी साजरी होईल.
कोरोनाने मानवी प्रगती चा वेग जरी मंदावला असला पण माणसाला कोरंटाइन नावाने एकांत दिला,आत्मचिंतन करण्यास वेळ दिला.जो सतत कुठल्यातरी हवाश्या पोटी धावत होता त्याला एका ठिकाणी थांबवले.हे जग अंतराळ मोहीम,मोठ्या-मोठ्या विज्ञान संशोधनात गुंतले होते त्यांना एक शुल्लक लस शोधण्यास भाग पाडले, सार्वजनिक ठिकाणी वागण्याच्या पद्धती, मास्क वापरणे,पुन्हा पुन्हा हात धुणे या बेसिक गोष्टी शिकवल्या ज्यांचा भविष्यात पुढच्या पिढीला आरोग्यदाई फायदाच होईल.
वैद्यकीय सेवा आणि पोलीस कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने संपूर्ण लोकडाऊन काळात कौतुकास्पद कामगिरी बजावली.या कोरोना योध्यांनी आपल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.स्वतःच्या,परिवाराच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाला थोपवत होते.सहकाऱ्यांचा होत असलेला मृत्यू बघून सुद्धा त्यांचे धैर्य डगमगले नाही.सिनेमाने मालिन केलेले पोलिसांचे चरित्र खोटे ठरवत खाकीत दडलेला सामाजिक भान,माणुसकीची जाणीव असलेला एक कर्ता आपण अनेक व्हिडिओ,बातम्यांमधून बघितला.लॉकडाऊन मधील अनुभव बघता पोलिसांचे कर्तव्य पार पाडत असतांना कधी मवाळ,दयेचा पाझर तर कधी शुष्क, कठोर होऊन रस्त्यावर त्यांच्या कार्यक्षमतेची नव्याने ओळख करून देत होते.यात काही उद्योगपती,सिलेब्रिटी आणि स्वयंसेवी संस्था यांनी विविध स्वरूपात केलेलेे योगदान देखील वाखानन्या जोगी आहे.सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श स्थापित करत,अत्यंत प्रेरणादायी कामे या लोकांनी केलेली आहे.
लॉकडाऊन मध्ये कोणी काय गमावले कोणी काय मिळवले हा व्यक्तिशः ज्याचा त्याचा स्वतंत्र अनुभव असू शकतो.पण सामूहिक स्तरावर निश्चितच काही गोष्टींच्या अखंड परंपरेला कोरोनाने छेद दिला.यात शेकडो वर्षांपासून चालू असलेल्या छोटे-मोठे उरूस,यात्रा रद्द करण्यात आल्या.कदाचित यामुळे आपल्याला कुठलाही फरक पडला नसावा. पण यावर अवलंबून असलेले ज्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत हे जत्रा,उरूस आहे असे रहाट पाळण्या-खेळण्यावालेे,मंदिरासमोरील पान-फुल विक्रेता,लोकनाट्य कला मंडळी इत्यादी संबंधित लोकांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागला असेल हे त्यांनाच माहिती आहे.यासोबतच साहित्य संमेलने,अनेक सांस्कृतिक महोत्सव कोरोना काळात रद्द झाल्या कारणाने वाचक,रसिक यांना चुकचुकल्या सारखे वाटत राहिले.तसेच क्रीडा क्षेत्रातल्या मानाच्या शर्यती देखील म्यानच होत्या.
2020 या संपूर्ण कोरोनामय वर्षानंतर आशा आहे की पुढील वर्ष हे सर्वांच्याच आरोग्यासाठी हितकारक राहो,सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला बाधक ठरणाऱ्या या वैश्विक महामारी कोरोनापासून जगाला पुन्हा उभे राहण्यासाठी बळ मिळो.आणि विस्कटलेली मानवी जीवनाची घडी नव्या जोमाने,नव्या ताकतिने पूर्ववत होवो.