सारांश लेखन म्हणजे काय ?
सारांश या शब्दाचा अर्थ आहे संक्षिप्त, सार,एखादया गोष्टीचा निचोड,मथितार्थ.सारांश या शब्दातच आपल्या लक्षात येते नेमके काय करायचे आहे.एखादया साहित्यकृतीतील प्रमुख कल्पना,महत्वाच्या विचारांशी संबंधित मुद्द्यांचे स्पष्टपणे थोडक्यात केलेले लेखन म्हणजे 'सारांश लेखन'.
कुठल्याही गद्य पद्य साहित्यकृतीचे तात्पर्य एका वाक्यातही सांगता येते. संक्षेप करताना अनावश्यक विस्तार टाळून संक्षेप तयार होतो.मध्यवर्ती कल्पना खुलवून आशय व्यक्त करता येतो पण ह्या सारांश लेखनाच्या ह्या पद्धती नाही.सारांश लेखनाची काही तंत्रे असतात त्या पद्धतीनेच सारांश लिहिला जातो.त्या अगोदर सारांश लेखन का केल्या जाते हे बघू.
सारांशलेखनाचे उपयोग आणि महत्व
जगातील ज्ञान स्मरणात ठेवण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी व आपले वेगळेपण स्पष्ट करायला सारांशाचे तत्व उपयोगी पडते.माहितीचे संकलन,संवर्धन सारांशामुळेच शक्य होते.आपल्या आकलनाचा पडताळा सारांशातुनच घेता येतो.
स्वयं-अध्ययनाबरोबर भाषणांच्या टिप्पणी घेणे,बातमी वृत्त यांचे पुनर्लेखन करणे, नोट्स तयार करणे,यासाठी सारांशलेखन कौशल्याचा उपयोग होतो.
सारांशलेखनाची तंत्रे/ सारांश लेखन कसे करावे
साहित्यकृतीतील आशयशोध,प्रत्येक वाक्यांचा सार/संक्षेप,विचारविकासक्रम,कच्चा मसुदा, शीर्षक व स्वभाषेत अंतिम लेखन.ही सारांशलेखनाची तंत्रे आहेत.
परिच्छेदाच्या सुरुवातीच्या एक दोन वाक्यात त्या परिच्छेदाचा मुख्य विचार मांडलेला असतो.उदाहरण आणि रुपकांच्या साह्याने स्पष्टीकरण केलेले असते.शेवटच्या वाक्यांमध्ये परिच्छेदाचा उपसंहार असतो.
उताऱ्यातील मुख्य विचार लक्षात घेण्यासाठी उतारा दोन तीन वेळा वाचावा. याने विषयाचे पूर्णपणे आकलन होईल व उताऱ्याला योग्य शीर्षक देता येईल.मुख्य मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ असलेले पूरक विचार शोधावेत.एकूण उताऱ्याचे काय तात्पर्य सांगितले आहे तेही लक्षात घ्यावे.मुख्य मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी लेखकाने वापरलेले अलंकार,म्हणी,उदाहरणे इत्यादी मूळ उताऱ्यातून वेगळे काढावे.आणि त्यातील पूरक विचार,मुख्य विचार,तात्पर्य यांचा स्वतःच्या भाषेत गोषवारा लिहावा.
विद्यार्थ्यांनी सारांशलेखन स्वतःच्या भाषेत करावयाचे असते.सारांश वाचूनच वाचकाला मूळ उताऱ्यातील विचार समजले पाहिजे.लेखनाची भाषा सरळ,सुबोध,सोपी असावी.शब्द अर्थपूर्ण व सुटसुटीत असले पाहिजे.एक तृतीयांश सारांश लेखन (1/3) लांबी आदर्श मानली जाते.त्यामुळे जास्त पाल्हाळ न आणता समर्पक शीर्षक दिल्या नंतर गौण व मुख्य मुद्द्याचे वर्गीकरण करून मुख्य विचार मांडणारे पहिले वाक्य लिहून त्यानंतर प्रमुख विचारला पूरक विचार मांडावे.मुख्य विचार वाक्ये व पूरक विचारांची वाक्ये यांच्यातील क्रम व संबंध तसाच राहू द्यावा.परंतु क्रम बदलल्यामुळे लेखन रेखीव व स्पष्ट होत असेल,आशय ठळक होत असेल तर क्रम बदलण्यास हरकत नाही.मूळ उताऱ्यातील म्हणी इ.अर्थाच्या स्पष्टीकरणासाठी उपयोग होत असल्यास तो थोड्या प्रमाणात करावा व शेवटी तात्पर्य सांगून सारांश लेखन संपवावे.
सारांश कौशल्याचा पडताळा
सारांश लिहून झाल्यानंतर तो योग्य झाला आहे किंवा नाही हे तासून पाहण्यासाठी पुढील प्रश्न स्वतःलाच विचारा.
1) सारांशातील वाक्ये एक विचाराने बांधलेली आहेत ना? 2) आशयाची कोठे पुनरुक्ती झाली आहे का? 3) एखादी वाक्यरचना विस्कळीत,तौल बिघडवणारी आहे का? 4) तेच-तेच,अनावश्यक शब्द कोठे राहिले आहेत का? 5) लेखकाच्या भाषाशैलीचा मोह आपल्याला कोठे पडला आहे का?
वरील प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे होय आणि त्यानंतर पुढे चारवेळा नाही अशी आल्यास सारांश चांगला झाला आहे असे समजावे.