मराठी नाट्यप्रकार, लोकाविष्कार,लोककलाप्रकार

Play theater symbolic audience red curtain image




नाटक हा शब्द अगदी बालपणापासूनच आपल्या कानावर पडतो,तो सोंग अथवा खोटेपणा या अर्थाने.पण हा खोटेपणासुद्धा खरा वाटावा असा असला तरच त्याला नाटक म्हटले जाते.नाटक हा एक वाङ्मय प्रकार आहे.पण हा केवळ वाचनासाठी निर्माण झालेला नाही.हा दृक्-श्राव्य (audio-visual) स्वरूपाचा वाङ्मय प्रकार आहे.

नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता(script) आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक.हे सादरीकरण नेपथ्य,संगीत,प्रकाशयोजना,अभिनय इत्यादी घटकांच्या मदतीने करता येते.पण या सर्व घटकांची सुप्त शक्ती शब्दांनी तयार झालेल्या संहितेत असावी लागते

नाटक हे मूलतः सादरीकरणासाठी लिहिले जाते.वाङ्मय कला आणि सादरीकरण या दोन्ही अंगाने नाटक या कलाप्रकाराच्या अनेक व्याख्या देता येतात.त्यातल्या त्यात 'नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्या द्वारा व्यक्त होणारा संघर्षमय कथात्म अनुभव' अशी जास्तीत जास्त समावेशक व्याख्या आपणाला सांगता येते.

रचनेच्या दृष्टीने शोकात्मिका,सुखात्मिका,प्रहसन, मेलोड्रामा हे नाटकाचे चार प्रकार आहे. तसेच परंपरेने चालत आलेल्या कलाप्रकारांनी वरील नाट्यप्रकारांच्या रचनेत भर टाकली आहे असे लोकाविष्कार प्रथम पाहू.

मराठी नाटकाचे प्रकार(अन्य रंगमंचीय अविष्कार)

लोकाविष्कार(सुंबरान,दशावतार,लळित,दंडार,तमाशा,कीर्तन,भारुड,सत्यशोधक जलसे,आंबेडकरी जलसे इ.)हे सर्व लोककलाप्रकार हे सादरीकरणाचे कला प्रकार होत.
सुंबरान व दंडार हे जातीविशिष्ट लोककला आहे.सुंबरान हा प्रामुख्याने धनगर जातीचा तर दंडार हा पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या मागता असणारा जो वर्ग होता त्यांनी सादर करावयाचा कलाप्रकार.
कीर्तन या लोककला प्रकाराला महाराष्ट्रात फार मोठी परंपरा आहे.एखादा तात्विक विचार कथेची जोड देऊन गायन पध्दतीने सादर केला जाणार प्रकार म्हणजे कीर्तन. कीर्तन विशिष्ट जातीच्याच व्यक्तीने करावे असे बंधन नाही.अथवा कीर्तन जीवनातल्या कुठल्याही विधीशी संबंधित नाही.त्यामुळे हा कलाप्रकार अतिशय लोकप्रिय आणि सर्वव्यापी आहे.भारुड कीर्तनातच सादर करावयाचा विशिष्ट पद्यरचना प्रकार आहे.भारुडातील आशय नाट्यपूर्ण पद्धतीनेच सांगितला जातो.
महाराष्ट्रात दोन प्रकारचे जलसे रूढ आहेत.सत्यशोधकी जलसा आणि आंबेडकरी जलसा.परंपरेने चालत आलेल्या तमाशाचे रंजक रूप म्हणजे लोकनाट्य.तर परंपरेने चालत आलेल्या तमाशाचे उद्बोधनपर रूप म्हणजे जलसा.वरील दोन्ही प्रकारांच्या नावातच दोन महापुरुषांच्या वैचारिक प्रेरणेचा निर्देश आहे.

या सर्व लोककलाप्रकारांचा मराठी रंगभूमीने आपल्या विकासासाठी सामग्री म्हणून उपयोग करून घेतला.या कला प्रकारांची सुप्त शक्ती मराठी नाट्य लेखकांनी पचवली आणि मराठीतल्या नाटकाला समृद्ध केले.रूढ अर्थाने या प्रकारांना 'नाटक'म्हंटले जात नाही,परंतु रंगमंचाचा वापर ते करीत असतात.

प्रमुख नाट्यप्रकार

1) शोखात्मिका Tragedy 2) सुखात्मिका Comedy 3) क्षोभप्रधान नाट्य Melodrama 4) प्रहसन Farce 

स्थूलमानाने नाटकाचे चार प्रकार पडतात.वरील चारही प्रकार युरोपीय अथवा पाश्चात्य नाटकांचे आहेत.मराठी नाटकाची गेल्या शे-दीडशे वर्षातील वाटचाल युरोपीय प्रभावाखाली झाली.म्हणून मराठीतल्या नाटकाचेही हेच चार प्रमुख प्रकार आहेत.

शोकात्मिका म्हणजे काय ?

शोकात्मिका हा पाश्चात्य आणि ग्रीकांचाच आत्माविष्कार आहे.भारतीय तत्वज्ञानात शोकात्मिका बसत नाही.शोकात्मिका मराठीतही नाही पण त्याच्या जवळपास जाणारी नाटके आहेत.काही पाश्चात्य शोकात्म नाटकाचे अनुवाद सिद्ध झाले आहेत.उदा. हॅम्लेट,ऑथेल्लो इ.

Tragedy मध्ये कथावस्तूएवढेच कथावस्तूच्या नायकालाही महत्व असते.शोकात्मिकचा नायक चांगला आणि सद् वर्तनी असायला हवा.त्याच्यात दुष्टपना असू नये.दुष्ट माणसाला आपल्या अध:पाताचा खेद वाटत नाही.तो सामान्याहून वरच्या कोटीतला असावा.त्याला जीवनातल्या मूल्यांविषयी आदर असायला हवा.दुष्ट माणूस आपत्तीत सापडला तर आपणाला वाईट वाटत नसते.अत्यंत सज्जन माणसावर सतत संकटांचा आघात झाला तर आपणाला करुणा वाटते पण भीषणता जाणवत नसते.त्यामुळे शोकनाट्याच्या नायकात एखादा स्वभावदोष असायला हवा. त्याच्या या स्वभावदोषातून त्याची कृती आपणाला भीषणतेकडे नेते.

सुखात्मिका म्हणजे काय ?

शोकात्मिकेचा नायक हा नेहमीच राजा अथवा उच्चकुलीन आदरणीय व्यक्ती असते.सुखात्मिकेचा नायक मात्र एखादा शहरी नायक संभवतो.शोकात्मिकेत नायकाचा दारुण अंत असतो.सुखात्मिकेत मात्र नायकाचा अंत होत नाही.शोकात्मिकेच्या नायकाच्या वाट्याला दुःखभोग येतो.त्याचे कारण नियती असते किंवा त्या नायकाचाच एखादा दोष असतो.या नायकाचे मन अत्यंत संवेदनाक्षम असते.त्याचा विवेक जागा असतो म्हणून त्याला आपल्या कृतीचा पश्चाताप होतो.समोर आलेल्या संकटाला तो धैर्याने सामोरे जातो.

सुखात्मिकेचा नायकच मुळी सामान्य माणूस असतो.त्यामुळे त्याला आपल्या दोषाची जाणीव असते.या दोषामुळे आपले हितसंबंध धोक्यात येऊ नयेत यासाठी तो दक्ष असतो.त्यासाठी तो कधी वाटा शोधतो तर कधी पळवाटा.जगाचा स्वाभाविक टणकपणा समजून घ्यावा,त्याच्याशी टक्कर देऊन आपला अंत का ओढवून घ्यावा?असे व्यावहारिक शहाणपण सुखात्मिकेच्या नायकाजवळ असते.

सुखात्मिकेचा जन्म प्रेक्षकांना आनंद देण्यासाठीच झालेला असतो.भारतीय मानसिकता देखील नाटक आनंद देते असेच मानते.त्यामुळे मराठीत सुखात्मिका,मेलोड्रामा आहे.

प्रहसन[फार्स) व मेलोड्रामा

'फार्स' साठी मराठीत प्रहसन हा पर्यायी शब्द वापरला जातो.हास्यरसप्रधान अथवा विनोदी नाटक हे आणखी दोन शब्द पर्यायी म्हणून वापरले जातात.यात हास्यजनक संवाद,धूर्त लोकांच्या संभाषणातून ढोंगाचे दर्शन घडवले जाते.

फार्समध्ये अकल्पित घटना येतात.पात्रांच्या वागण्याबोलण्यातून कमालीची विसंगती आणि अतिशयोक्ती व्यक्त होते.त्यामुळे फार्सचे कथानक शक्यता आणि संभवनीयतेच्या बंधनापासून फार दूर असते.

मेलोड्रामा

मेलोड्रामा क्षोभप्रधान नाटक या नावाने हा प्रकार रूढ झाला.melos म्हणजे 'गाणे' melo drama  म्हणजे drama with song नाटकातील सुखदुःख मिश्रित क्षोभ संगीताच्या योजनेमुळे अधिक उत्कट आणि भडक होतो.भावविवश परिणाम घडवून आणणे हे मेलोड्रामाचे लक्ष असते.

मराठीत सगळ्यात जास्त लिहिला गेला तो मेलोड्रामा.त्याचे महत्त्वाचे कारण असे की.शोकात्मिकेचा ताण सहन न होणारा फार मोठा प्रेक्षक असतो.या प्रेक्षकाला करमणूक हवी असे.'मेलोड्रामा'त संगीताची सोय आहे.त्यामुळे संगीत हे करमणुकीला अतिशय सोयीस्कर आहे.

नाटकाचे उपप्रकार व आशयानुरूप वर्गीकरण

नभोनाट्य,संगीतिका,नाटयछटा,एकांकिका,एकपात्री प्रयोग,दीर्घाकं
हे नाटकाचे उपप्रकार मानले जातात.

वर्गीकरण

सामाजिक,ऐतिहासिक,राजकीय,पौराणिक,समस्याप्रधान,द -लित,स्त्रीवादी,चर्चाप्रधान