वाचन का?व कसे?-वाचनाचे प्रकार आणि फायदे

Two boys reading books on the grass image

साक्षर व सामुदायिक जीवन जगणारा माणूस नेहमीच वाचन करत असतो.वाचतांना लिहलेले डोळ्यांनी पाहून ओळखणे एवढेच आपल्याला अपेक्षित नसते.मजकूर,ओळींचा,अर्थ बोध होणे जरुरी असते.लेखन आणि वाचन या क्रिया व त्यांची कौशल्ये एकमेकांशी इतकी निगडित आहेत की,एकाशिवाय दुसऱ्याचा अभ्यास शक्य होत नाही.वाचल्याशिवाय (स्वतंत्र)लेखन शक्य नाही व लिहलेले असल्याशिवाय वाचन शक्य नाही.

इथे आपण वाचना संबंधित काही गोष्टींचा विचार करणार आहोत.

1)वाचन का करावे?वाचन केल्याने काय होते?

वाचनाचे महत्व अपार आहे,कारण तसे त्याचे फायदेच खूप आहे.विपुल प्रमाणात आणि चिकित्सक वाचनाने आपल्या अनुभवात भर पडते.अमर्याद माहिती संग्रही राहते,दृष्टी व्यापक होते,अध्ययन सखोल होते,पुन:पुन्हा केलेल्या वाचनाने स्मरण होते.विचार/मत निश्चित होण्यास मदत होते.मूल्यमापणात्मकआकलन,बोधन व तर्क पातळीत वाढ होते.तसेच पुढील काही गोष्टींचा समावेश वाचनाचे फायदे यात करता येईल.

1.1:-वाचन संस्कृती - परंपरा

संस्कृती आणि परंपरा यांची ओळख वाचनातूनच होते.सामाजिक,ऐतिहासिक कथा-कादंबऱ्या,भाषांतरित रूपांतरित साहित्य,नाटक इतर ललित यातून त्या त्या भाषिक समूहाच्या परंपरा,संस्कृती परिचित होते.रूढी,मिथके,भ्रम,ग्रह,संकेत,रीतिरिवाज यांंचे ज्ञान लिखित मजकुरांतून होत असते.

1.2:-कल्पनाशक्ती वाव

साहित्य वाचत असताना लेखकाने उभ्या केलेल्या व्यक्तिचित्रांबरोबर वाचकही स्वतंत्र कल्पनाचित्रे रंगवितो.त्यात आपापल्या कुवती क्षमतेनुसार भर घालतो.लेखकाचा सूचित अर्थ लक्षात घेऊन नवी प्रतिकल्पनासृष्टी तो उभारतो. साहित्यात लेखकाबरोबरच वाचकांच्या स्वतंत्र कल्पनासृष्टीला म्हणूनच महत्व असते.चांगला आस्वाद म्हणजे वाचकाची चांगली कल्पना.

1.3:-भाषाकोश

विविध विषयांतील पुस्तकांच्या वाचनातून आपला शब्दसंग्रह समृद्ध होतो.शब्दांचा योग्य तो अर्थ,वाक्प्रचार,म्हणी,वाकयोक्ती,व्यंगार्थ इत्यादी अनेक भाषाविष्कारांच्या परीचयाने आपली भाषिक क्षमता वाढते.

1.4:-जिज्ञासापूर्ती 

लहानपणापासूनच आपल्याला अनेक क्षेत्रांविषयी कुतूहुल वाटत असते.वीर राजपुत्र,परी,राक्षस,चेटकीण इत्यादींच्या कुतूहुलातून आपण वीरकथा,परीकथा वाचत असतो.विज्ञानकथा,रहस्यकथा आपल्या वाढत्या वयातील कुतूहुल पूर्ण करत असतात.थोरामोठ्यांची चरित्रे,व्यक्तींचा अतुलनीय पराक्रम कर्तबगारी आपल्यासमोर ठेवत असतात. प्रवासवर्णन,देशोदेशीच्या इतिहास,भूगोल, संस्कृती परिचित करून देत असतात.अशा अनेक प्रकारातील साहित्य वाचनाने आपली जिज्ञासा तृप्त होत असते.

1.5:-बहुश्रुतता 

विपुल प्रमाणात वाचन केल्यास आपल्याला अनेक विषयांची माहिती होते.लेखकांचा जीवनाविषयीचे दृष्टिकोन आपल्याला परिचित होतात.त्यांच्या शैलीची माहिती होते.ही शैली ही मते आपला दृष्टिकोन तयार करण्यास मदत करतात.वाचनाने विचार प्रगल्भ होऊन अनेक कसोट्यांवर आपण आपली मते तपासू शकतो,नव्याने घडवू शकतो.

1.6:-वाचन संबंधित कौशल्ये

वाचनाशी लेखन,टिपण,संभाषण,वक्तृत्व अशी अनेक कौशल्ये संबंधित आहे.या कौशल्यांच्या विकासात वाचनकौशल्याचा सिंहाचा वाटा आहे.स्वतंत्र लेखन करण्यासाठी विपुल वाचन उपयुक्त ठरते.लिहिन्यापूर्वी वाचलेले असेल तर टिपण काढणे सोयीचे जाते.संभाषणात पण आपल्या वाचनातील संदर्भ,दाखले देऊन आपण आपली स्वतंत्र छाप पाडू शकतो.

2)वाचनाचे प्रमुख प्रकार 

आपण कधी मोठ्याने,कधी मनात वाचीत असतो.कधी सहज दुकानांच्या पाट्या, जाहिराती दिसल्या म्हणून तर कधी जाणीवपूर्वक आवश्यक म्हणून वाचतो.तर कधी फारशी गरज नसतानाही वाचतो.

अशा वाचनाचे वाचकाच्या हेतूनुसार,स्वरूपानुसार प्रकार पाडता येतात.

2.1:-प्रकट वाचन 

दुसऱ्याला स्पष्ट रीतीने कळेल अशा रितीने मोठ्याने केलेले वाचन म्हणजे प्रकट वाचन.लेखकाने लिहिलेले विचार,भावना,कल्पना योग्य त्या विरामचिन्हांसह,योग्य ठिकाणी आघात देत,स्वरांच्या चढउतारासह शुद्ध उच्चार करीत श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे हे वाचकाचे काम असते.वाचन एक कला आहे,अशा कला कौशल्याचा उपयोग वक्ता,शिक्षक,वकील,दुभाषी,वृत्तनिवेदक, संदेशवाचक,पत्रवाचक या व्यवसायातील लोकांना होतो.

2.2:- मूक वाचन

मनातल्या मनात स्वतःसाठी केलेल्या वाचनाला मूक वाचन म्हंटले जाते.अर्थग्रहनासाठी,आनंदासाठी, अभ्यासासाठी असे वाचन उपयुक्त ठरते. हे वाचन करतांना ओठांच्या हालचाली,उच्चारणासाठी लागणार वेळ व शक्ती खर्च होत नसते.

3:-अध्ययनप्रवण वाचन

अध्ययन करणे म्हणजे काय?तर विषयाचे आकलन करणे.चिकित्सा/विश्लेषण करून माहिती मिळविणे होय.आपण जे वाचतो ते अध्ययनासाठी उपयुक्त ठरावे यासाठी,विशेषतः विध्यार्थ्यांनीं काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.

Girl in library with books in hand,reading importance marathi




3.1:-सर्वेक्षण

सर्वेक्षण म्हणजे कोणतेही प्रकरण वाचण्यापूर्वी एकदा चाळणे.म्हणजे लेखकाचा परिचय,शीर्षके,उपशीर्षके,अवतरणे,पाठाची सुरुवात,शेवट इत्यादी ओझरते नजरेखालून घालणे.या प्रकारे पुस्तकातील मूलभूत कल्पना समजून येते.

3.2:-प्रश्ननिश्चिती

ज्या घटकांचा अभ्यास करायचा आहे त्या घटकाचे निरनिराळ्या प्रश्नात रूपांतर करा.पाठयघटक व उपघटक ह्यातील विषयावर सोपे प्रश्न तयार करा,म्हणजे वाचनाचे उद्दिष्ट निश्चित होईल. उद्दिष्टानुसार वाचन केल्यास ते अर्थपूर्ण होते व वाचनाची गोडी लागते.

3.3:-वाचन

आता घटक,उपघटक विभाग या पैकी एक एक भाग वाचावयास सुरुवात करा.फक्त एका वेळेस एक उपघटक/विभाग एकाग्रतेने वाचा व तुम्हीच तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा.

3.4:-विचार व घटकांचे पुनर्वाचन

वाचतांना विचार करा.लेखकाला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या.काय वाचले?कितपत समजले?प्रश्नांची उत्तरे मिळाली का?हे समजून घेऊन पुन्हा उपघटकाचे वाचन करा.

3.5:- मनन व उजळणी

आपण जे वाचले ते क्रमशः आठवून पहा हे मनन जेवताना,फिरताना वगैरे इतर कामे करतानाही कुठेही करता येते.वाचताना जे महत्त्वाचे वाटले ते पुनर्वाचनात नजरेने टिपले जाते.आता तोच मजकूर थोड्या थोड्या कालावधीने वाचा.अशा सरावाने मजकूर लक्षात राहतो व आकलन पूर्ण होते.