Self Hypnosis in marathi स्वसंमोहन मराठी माहिती

Girl sleeping in hypnosis trance




स्व संमोहन उपचार पद्धती झोप येण्यासाठी उपाय आहे का?

 

झोपे संबंधित सुरुवातीला दुर्लक्षित झालेल्या छोट्या समस्या नंतर आजाराचे रूप घेतात, याला वेळीच आळा घालण्याचे काम स्व - संमोहनाच्या माध्यमातून शक्य आहे.

कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले त्यातलेच एक म्हणजे पुरेशी झोप का गरजेची आहे.वैद्यकीय तज्ज्ञांनी झोप आणि रोग प्रतिकार शक्ती यातले संबंध अधोरेखित केल्यावर कित्येकांना 'जाग' आली की आपली 'झोप' पूर्ण होत नाही किंवा आपल्याला झोपच येत नाही.मग सुरू झाले गूगल " 8 तासाची झोप 4 तासात कशी घेता येईल" " झोप येण्यासाठी उपाय " यात काही गैर नाही.तहान लागल्यावर विहीर खोदण्याची,मानवी प्रवृत्तीच आहे.झोप न लागण्याचे किंवा पुरेशी झोप न होण्यामाघे अनेक मानसिक व शारीरिक कारणे असू शकतात.जसे तणाव,भीती,भविष्याची चिंता,शारीरिक परिश्रम नसलेली कामे,व्यसने आणि हल्लीच्या काळात सोशल मीडिया.रात्री उशिरापर्यंत मेसेज,स्टेटस,लाइक,शेअर यातून सुटका झाली तर पडल्या-पडल्या अर्धा पाऊण तास उद्याचा विचार,यामध्ये कधी एक-दीड वाजतात कळून येत नाही.पुन्हा सकाळी लवकर उठून रोजची रुटीन,मग सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणे,डोळ्यांची जळजळ,डोळे लाल होणे,आळस वाटणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
बऱ्याच लोकांना झालेली झोप समाधानकारक वाटत नाही म्हणजेच आपण ज्याला 'शांत' झोप म्हणतो ती तशी झोप न येता,बॅकग्राउंड मध्ये कुठलीतरी गाणी ऐकू येत आहे किंवा कुठलातरी संख्या हिशोब चालू आहे असे झोपेत वाटत राहते आणि 'भयानक स्वप्ने' ती तर वेगळीच.

स्व संमोहणातून "झोपेच्या समस्यांवर उपाय" एकाच शिबिरातून शक्य झाला


यातल्याच काही समस्यांना तोंड देत असताना २००९ मध्ये पेपर मधल्या एका छोट्या जाहिरातीने लक्ष वेधून घेतले,त्यात माईंड पॉवर,मेमरी पॉवर,दोन दिवसात व्यसन मुक्ती अशा मथळ्यात झोपे संबंधित असलेल्या ओळीने जाहिरात पूर्ण वाचण्यासाठी भाग पाडले.ती जाहिरात होती संमोहनाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे,संध्याकाळी असल्यामुळे जाणे शक्य झाले.आणि लगेच दुसऱ्या दिवशी चालू होत असलेल्या सात दिवसाच्या स्व संमोहनाच्या कोर्ससाठी नाव नोंदणी केली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजेला त्यांनी सांगितल्या प्रमाणे जेवण करून गेलो.एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गच्चीवर प्रशिक्षण देण्यात येणार होते.तीन तास चालणाऱ्या शिबिरात सुरुवातीला तास दीड -तास संमोहन म्हणजे काय ,संमोहन शास्त्र आणि सकारात्मकता या बद्दल माहिती दिली.छोट्याश्या विश्रांती नंतर प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली.तो पर्यंत
संमोहन कर्त्याने चांगले वातावरण तयार केले होते.लयात बोलल्या जाणाऱ्या वाक्यात मंत्रमुग्ध झाल्या सारखे वाटत होते.
"पापण्यांची उघडझाप - उघडझाप..डोळे बंद.. डोळ्यासमोरील अंधार वाढत चालला आहे.." आणि असे म्हणताच खरच एखादया अंधाऱ्या खाईत फेकल्या गेल्या सारखे वाटले(पुढील आठ दिवसात लक्षात आले की ते लाइट्स बंद करत होते) आयुष्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच मनाच्या सुप्त विभागात प्रवेश मिळाला होता.मेडिटेशन करायचो पण ही त्या पुढची पायरी होती.पुढे त्यांनी रोज दीर्घश्वसन करून येण्यास सांगितले त्यामागचे कारण जलद वा अनियमित श्वासोच्छ्वासामुळे स्व संमोहणात घेतल्या जाणाऱ्या कमांड/सूचना प्रभावी ठरत नाही.पहिल्याच दिवशी गाढ तंद्री (ट्रान्स) मध्ये नेऊन तुमच्या अवचेतन मनात एक शब्द किंवा त्याला कीवर्ड म्हणता येईल तो फिट केल्या जातो,जो पुढे आयुष्यात कधीही स्व संमोहणात जाण्यासाठी उच्चारला गेला तर तुम्ही गाढ झोपेत किंवा स्व संमोहनाच्या उच्चतम तंद्रीत जाऊ शकाल.रोज आत्म-संमोहनाच्या नवीन-नवीन पातळीवर नेण्याचे काम संमोहन कर्ता चोखपणे करत होता.एखादा तंद्रीत गेला नाही किंवा बाहेर आला तर संमोहन कर्ता त्याच्या जवळ जाऊन डोक्यावर हाथ ठेवताच प्रचंड चुंबकीय शक्ती/वेव्ह निर्माण होत व समोरचा त्वरित खोल तंद्रीत जात.
दुसऱ्या दिवसापासूनच स्व संमोहन करण्याची व त्या अवस्थेत राहण्याची मजा वाटू लागली.कित्येक दिवसात न मिळालेली शांत झोप संमोहन अवस्थेत मिळू लागली पण इथे त्यांनी अश्या कमांड दिल्या होत्या की दिवसा या अवस्थेत गेला आणि झोप लागली तर संमोहन अवस्था दोन तास राहील,दोन तासानंतर आपोआप जाग येईल,रात्री सहा तासाची झोप राहील व त्या नंतर जाग आल्यावर झोप पूर्ण झालेली असेल,तसेही वीस मिनिटांची पूर्ण तंद्रीतील स्व संमोहन म्हणजे एक तासाच्या झोपे एव्हढे आहे.सुरुवातीला ज्या सूचना घ्यायचो त्या शरीराच्या अवयवांच्या स्नायूंना आराम देण्या करता असत,त्या काम करत पण झोपे संबंधीतल्या सुचनांना मनातल्या चल बिचली मुळे आणि कित्येक वर्षांपासून असलेल्या झोप न येण्याच्या सवयीमुळे,त्या सुचनांना योग्य साथ मिळत नव्हती.पण सरावाने तेही जमू लागले.एक ते दहा अंक मोजण्याच्या आत झोप येऊ लागली.रात्री किंवा दिवसा ठरवून दिलेल्या वेळेच्या आत जागे व्हायचे असेल तर मनाचा अलार्म लावावा लागत असे म्हणजे मी जर बारा वाजेला झोपलो तर माझी झोप त्यांनी कमांड दिल्या प्रमाणे सकाळी सहा वाजेला पूर्ण होईल पण मला जर पाच वाजेला उठायचे असेल तर मला तश्या सूचना किंवा कमांड माझ्या अंतर्मनाला कराव्या लागतील.मग कधी ४.५० ला तर कधी ५.०५ला जाग यायची पण झोप शांत लागत,झोपेच्या ज्याकाही पाच अवस्था आहे त्यातल्या शेवटच्या दोन तीन अवस्थेतली झोप,संमोहन झोपेत मिळत होती.एके दिवशी पाहूण्यांकडे मुक्कामी गेलो,रात्रीच उशीर झाला होता आणि सकाळी एका महत्त्वाच्या कामाला सकाळी लवकर पाहुण्यांना घेऊन जायचे होते.मला आठवते १ ते १० नाही पण ५ मोजण्याच्या आत झोपलो होतो आणि मनाचा अलार्म सकाळी ६ चा लावला,सकाळी जाग येताच उशाशी असलेला मोबाईल बघितला तर बरोबर ६ वाजले होते.याचाच अर्थ आपल्या अवचेतन मनाला परिस्तिथीचे गांभीर्य कळते आणि त्याच पद्धतीने ते गोष्टींना महत्व देत असते,ज्या सूचना आपण घेत असतो त्यात सिरीयसनेस असायला हवी.हे त्या नंतर लक्षात आले.
Girl with alarm in hand


झोप येण्यासाठी काय करावे या विषयावर अनेक लेख तुम्हाला वाचायला मिळेल,चांगले तज्ञ मार्गदर्शन सुद्धा इंटरनेट वर ऑनलाइन मिळेल, काही पॉवर नैप तंत्र तर काही कॉग्नेटीव बीहेविरियल थेरपी (सी. बी. टी.) सुचवतील.पण गाडीचा प्लग शॉट झाला असेल तर कितीही स्टार्टर बदलले आणि कितीही बॅटरी बदलली तर चालू होणार आहे का? तसेच काही झोपेचा आणि मनाचा संबंध आहे.आणि नेमकी चेतनयुक्त मनाला अचेतन मना कडून चांगल्या सवयी स्व संमोहणातून लावल्या जातात.

स्वसंमोहन उपचाराचे इतर फायदे


शिबिरात प्रवेश करताना आपण एक फॉर्म भरून देतो त्या फॉर्मवरच आपली समस्या लिहून द्यावी लागते.संमोहन अवस्थेत गेल्यावर संमोहन कर्ता प्रत्येकाला एकमेकांपासून दूर नेऊन(कुणी जर संमोहन अवस्थेत गेला नसेल तर बाजूला देत असलेल्या सूचना ऐकू शकतो आणि त्याव्यक्तीची एखादी खासगी समस्या त्याने ऐकू नये साठी) आपल्या समस्यांवर काही सकारात्मक सूचना आपल्या अचेतन मनाला देतो आणि त्याच्या नंतर आपले चेतनमन त्या प्रकारे काम करायला सुरुवात करते.आमच्या बॅच मध्ये वीस स्त्री पुरुष होते ज्यात जवळपास सर्वांचेच प्रॉब्लेम दूर झाले.बरेच पुरुष सिगारेट,तंबाखू,दारू ची तलब सोडवण्यासाठी आले होते.त्यांनी त्या काळात व्यसन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना भयंकर उलट्या झाल्या,असे त्यांच्याकडूनच कळले.काही मुलांचा अभ्यासात मन न लागने,झोपेत बिछाना ओला करणे ह्या समस्या दूर झाल्याचे कळले.एकदाच केलेल्या स्व संमोहन शिबिराचे आजही उपयोग होत आहे म्हणून सांगावे वाटते संमोहन हे निद्रानाश समस्यावर प्रभावी उपाय आहे.पंचवीस टक्के लोकांवर संमोहनाच्या प्रयोगाचा परिणाम होत नाही म्हणतात म्हणजे ते संमोहन अवस्थेत जात नाही पण अनुभवावरून सांगता येईल,जर संमोहन कर्ता विषयात प्राविण्य मिळवलेला असला तर ते अशक्य नाही. तरीही ५० -५० टक्के दोघांवर अवलंबून असते, आपल्या मनाची तयारी असली तर आपण आत्म संमोहनाच्या उच्च स्थितीत जाण्याचा अनुभव घेऊ शकतो.आणि आपल्या शारीरिक पण ज्या मनाने निर्माण केल्या आहेत त्या समस्या दूर करू शकतो.