पत्र लेखनाचे महत्व:-लेखन सामग्री,लिपीचां शोध लागल्या नंतर पत्रलेखन हा कदाचित पहिला लेखन प्रकार अस्तित्वात आला असावा.आणि तो आजतागायत चालू आहे.पत्रलेखनाची परंपरा प्राचीन असली तरी त्याचे माध्यम स्वात्माविष्कारासाठी,संवादासाठी वापरण्याची दृष्टी आधुनिक आहे.
पत्राच्या माध्यमातून आपण फार चटकन दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो;तो त्यातील मोकळेपणामुळे,आपलेपणामुळे.पत्र लेखन दोन व्यक्तीत होत असल्याने दोघांनाही दडपण,संकोच वाटत नाही.यामुळेच त्यातील निवेदन सत्य व विश्वासार्ह वाटते.अनेक अवघड प्रश्न पत्रामुळे सोपे होतात.पत्र हे माहिती पुरवण्याचे,मिळवण्याचे साधन आहे.तसेच त्या आधारे सामाजिक व सांस्कृतिक स्तितिगतीचेही दर्शन होऊ शकते.जनसंपर्काचे ते महत्वाचे माध्यम आहे.
खासगी पत्रे व्यक्ती-व्यक्तीत सुसंवाद निर्माण करतात.शिफारसपत्रे व्यक्तीचे मोल सांगतात.तक्रारपत्रे,मागणीपत्रे व्यक्तीच्या अपेक्षा,गरजा व्यक्त करतात.वाङ्मयीन पत्रे मतप्रतिपदन करतात.आणि हे सर्व कमी वेळात व कमी जागेत होते.
पत्र लेखन पद्धती
पत्रे अनेक स्वरूपाची असल्याने त्यांच्या प्रकाराप्रमाणे त्यातील स्वरूप थोडेफार बदलते.कौटुंबिक पत्रात फारशी तंत्रे,पथ्ये पाळली नाही तरी चालते.कारण तिथे आपलेपणा,जिव्हाळा,मोकळेपणा हाच महत्वाचा असतो.भाषा खेळीमेळीची व घरगुती असावी.पत्रलेखक त्या व्यक्तीशी जणू बोलत आहे,अशा तऱ्हेची वाक्यरचना असावी.आई-वडिलांना,मोठ्या माणसांना किंवा शिक्षकांना,वरिष्ठांना पत्र लिहावयाचे असल्यास त्यात नम्रता असावी.घरगुती पत्रांचा प्रारंभ व शेवट औपचारिक मजकूर व घरगुती चौकशी यांनी करावा.
आजकालच्या आधुनिक युगात कौटुंबिक पत्रव्यवहाराचा जवळपास अंतच झाला आहे.मोबाईल,समाजमाध्यमे यांच्या जलद उपयोगापुढे पत्रव्यवहार अतिशय फिका वाटतो.व्यावहारिक जीवनातील उपयोग संपुष्टात येऊन हे पत्रलेखन तंत्र फक्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मर्यादित झाले आहे,असेच म्हणावे लागेल.असे असले तरी कार्यालयीन,व्यावसायिक उपयोगात येणाऱ्या औपचारिक पत्रव्यवहारांना आजही स्थान आहे.
व्यावहारिक व व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते.अशा पत्रांच्या सुरुवातीस आपले संपूर्ण नाव व पत्ता लिहावा.पत्राचा मायना संबंशीत व्यक्तीच्या योग्यतेप्रमाणे,पदाप्रमाणे,अधिकाराप्रमाणे ठेवावा.पत्राच्या विषयाची प्रारंभींच ठळक अक्षरात स्वतंत्र नोंद करावी.मांडवयाचा मजकूर मुद्देसूद असावा.अवांतर, अनावश्यक माहिती त्यात नसावी.विषय स्पष्टपणे,स्वतंत्र परिच्छेद पाडून मांडलेला असावा.पत्राची भाषा व्यावहारिक असली तरी वाचणाऱ्याला आपल्या पत्राचे महत्व वाटावे अशी ती आकर्षक व दखलपात्र वाटावी.पत्राच्या शेवटी आपले काम,मागणी निश्चितपणे पण सौम्यपणे लिहिलेली असावी.प्रारंभी भाषा कडक व नंतर सौम्य अशी असू नये.
पत्रलेखन कौशल्य पडताळा
पत्राचे त्वरित उत्तर ही चांगल्या लिखाणाची कसोटी आहे.आपला आग्रह, निवेदन,मत,मागणी यथायोग्यपणे नोंदवली गेली,असा त्याचा अर्थ होतो.दुसऱ्याचे पत्र आल्यावर आपणासही त्याला त्वरित लिहावेसे वाटणे हेही एक चांगल्या पत्राचे गमक आहे.सुयोग्य भाषा, नेमकेपणा,सुसंवाद,आटोपशीरपणा व जिव्हाळा साधता आल्यास पत्र उत्तम जमले असे समजावे.
निबंध लेखन
निबंध हा वैचारिक सृजनाचा व्यापक अविष्कार आहे.भाषिक सर्जनशीलता हा एक भाग झाला.संबंधित विषयासंबंधीची भरपूर पण नेमकी माहिती,त्या माहितीची कल्पकतेने, मुद्देसूदपनाणे परिच्छेदानुसारी योजना करून,आशयानुसारी भाषा वापरून नीटनेटकेपणाने विचाराचा बंध तयार करणे म्हणजे 'निबंध'.
निबंध हा फक्त शाळेतच लिहावा लागतो असे नाही.दीर्घ पत्रे,दीर्घ उत्तरे,वाचकांच्या प्रतिक्रिया,भाषणांचे मसुदा लेखन,लेख,परीक्षणे या सर्व ठिकाणी आपण कमी अधिक प्रमाणात निबंधच लिहीत असतो.आपले विचार व्यवस्थित, क्रमबद्ध मांडणे म्हणजे निबंध.यामध्ये आरंभ,गाभा व शेवट महत्वाचा असतो.
निबंधाचा उपयोग भावना व्यक्त करणे,चिंतन प्रकट करणे,सिद्धांतन करणे,अभिव्यक्ती करणे,आपले विचार मांडणे अशा प्रसंगी होतो.लघु,दीर्घ,ललित,विनोदी,संशोधनपर अशे निबंधाचे प्रमुख प्रकार पडतात.तेच स्वरूप व उपयोगिता स्पष्ट करतात.
निबंध लेखन कसे करावे
निबंधाचे स्वरूप लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार बदलत असते.लेखकाचा अनुभव,व्यासंग,अभिरूची,जीवनदृष्टी यांनुसार लेखकाचा तोंडवळा बदलतो.म्हणूनच प्रत्येकाचा निबंध वेगवेगळा होतो.तरीही निबंधांसाठी स्थूल मानाने पुढील तंत्रे लक्षात ठेवावी:
- निबंध विषयानुसार मुद्यांचा आराखडा,
- प्रत्येक मुद्दा तत्पूर्वीच्या मुद्द्यातून निष्पन्न झालेला एक संगतीसुत्र/विचारसुत्र,
- प्रत्येक मुद्यासाठी स्वतंत्र परिच्छेद-परिच्छेदास छोटे शीर्षक,
- विषय स्पष्टीकरणासाठी पूर्वानुभव,लोकपरंपरा,संकेत,वाकयोक्ती,थोरांची वचने यांचा उपयोग,
- सुरुवात व शेवट-आकर्षक स्पष्ट व परिणामकारक,
आपण लिहिलेला निबंध आपणास आवडावा,तसेच तो दुसऱ्यालाही आवडावा ही त्याची प्रमुख कसोटी आहे.आपल्याला हे साधले आहे किंवा नाही हे तटस्थ वृत्तीने दुसऱ्यांदा निबंधाचे वाचन केल्यास समजते.अनेकांचे लेखन वाचल्यावर आपल्यातील उणिवा लक्षात येतात.सतत व सकस वाचल्याने अनुभवांची समृद्धी होते.खास शैली, समर्पक उदाहरणे,निश्चित ठाम विचार ही चांगल्या निबंधाची लक्षणे आहेत.