निसर्ग/पर्यावरण संवर्धन मानवी जबाबदारी

Green environment with world environment day written on the image



आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निसर्ग,पर्यावरण कशाप्रकारे सांभाळत आहोत,हे बघण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी 5 जून रोजी साजरा होणारा World Environment Day जागतिक पर्यावरण सरंक्षण दिन हा मानवासाठी एक प्रकारचे रीमायडंरच असते.निसर्ग संगोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही.अनुभवावरून हे मानवाच्या लक्षात आले आहे.मणूष्याने कितीही प्रगती केली तरी निसर्गाला मर्जीत घेता येत नाही, त्याला ताब्यात करू शकत नाही हे मागील काही दशकात जगभरातील अनेक नैसर्गिक प्रकोपाने हे दाखवून दिले आहे.भारतातीलच उदाहरण द्यायचे झाल्यास आपण ते केदारनाथ जलप्रलयाचे देऊ शकतो.नद्यांमध्ये घर,हॉटेल्स बांधल्यामुळे नैसर्गिकरित्या पाण्याचा निचरा न होऊ शकल्याने एवढी हानी झाली होती.निसर्गावर आक्रमक केल्यास तो चोख प्रतिउत्तर देतो याउलट त्याचे संतुलन राखल्यास तो मदतच करतो.हे मागील वर्षी झालेल्या रेकॉर्डतोड पावसावरून सांगता येईल.कदाचित पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या लोकांसाठी तसा पाऊस सामान्य गोष्ट असेल.मात्र यावर्षी मराठवाड्याचा कित्येक वर्षांपासून असलेला दुष्काळ दूर झाला.आता याचे एखादे हवामानशास्त्रीय कारण असू शकेल.पण मागील वर्षीच्या लोकडाऊनमधील बंद असलेली वाहने व औद्योगिक कारखाने यांच्यामुळे नगण्य असे झालेले प्रदूषण,हे मात्र डोळ्यांपुढील कारण वाटते.

पर्यावरण ऱ्हासाची सुरुवात 18 व्या शतकातील औद्योगिक क्रांती घडून आल्यानंतरच सुरू झाली.हेच 'पर्यावरण व मानव' यांच्यामधील विसंवादाचे महान पर्व ठरले.औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणीय संपदाच्या वापरला प्रचंड गती मिळाली. या औद्योगिक क्रांतीनंतरच पर्यावरण आणि मानव यांच्यातील प्रस्थापित सुसंवाद नष्ट होण्यास सुरुवात झाली.शहरे वाढू लागली,मानवाचे राहणीमान उंचावले,गरजा व मागण्या यांच्यात वाढ झाली.मानवी विकासाच्या वाटचालीमध्ये पर्यावरणातील प्राणी,वनस्पती,हवा,मृदा,जमीन या संपदांवर अतिरिक्त ताण वाढत गेला. शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे हवा,पाणी,जमीन इ.मध्ये अनेक दुषितकांचे व रासायनिक द्रव्यांचे प्रमाण वाढून 'पर्यावरणाचे प्रदूषण'ही गंभीर समस्या निर्माण झाली.

पर्यावरणावर होणारा मानवी आघात एवढा जबरदस्त असतो की,त्यामुळे जीवसृष्टीमध्ये विस्कळीतपणा निर्माण होतो.मानवी क्रियांचा आघात निसर्गापेक्षा जास्त असल्याने भविष्यामध्ये धरतीमाता मानवास अन्न पुरवू शकेल की नाही याची शंका वाटते.मानवाने दूरदृष्टीने, शहाणपणाने आपले कौशल्य निसर्गाच्या संमतीने उपयोगात आणले तर पर्यावरणात आघात होणार नाहीत व भविष्यकालीन मानवी जीवन निश्चितच सुखकारक बनेल.सध्या जीवावरणातील जीवसमूहांचे परस्परावलंबीत्व धोक्यात येऊ लागले आहे.त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मानवावरच होणार आहे.हा धोका टाळण्यासाठी मानवाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर उपायांचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे.

Greta thunberg twitter post image on nature

परिस्थितीकी व पर्यावरण संतुलन :-पर्यावरणातील सर्वच घटकांचा एकमेकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो.या घटकांची एकमेकांवर क्रिया-प्रक्रिया चालू असते.यामधून एक परिस्थितीकी संस्था (ecology) तयार होते.या संस्थेत निसर्गनिर्मित काही बिघाड झाल्यास ते दुरुस्त करण्याचे कामही निसर्गच करीत असतो.परंतु मानवनिर्मित काही बिघाड झाल्यास या संस्थेचा तोल जातो व ही संस्थाच असंतुलित होते.हल्ली मानवनिर्मित बिघडांमुळे संपूर्ण ecology चे पर्यायाने 'पर्यावरणाचे संतुलन' बिघडू लागले आहे.

पर्यावरणाचे- 1)ऊर्जा 2)असंख्य जीवसंस्थांच्या अस्तित्वासाठी पोषकद्रव्ये(अन्न)व 3)सजीवांची निर्मिती-नाश हे तीन घटक महत्वपुर्ण आहेत.मोठया प्रमाणात इंधन उपलब्ध व्हावे म्हणून मानवाने अपरिमित वृक्षतोड केली.या झाडांच्या कत्तलीमुळे अनेक जीवांचा नाश झाला असून त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया थंडावली आहे.या सजीवांच्या निर्मिती-नाश या प्रक्रियांमध्ये मानवाने अशा पध्दतीने हस्तक्षेप केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडू लागले आहे.निसर्गाचा समतोल राखणे म्हणजे जे जीवशास्त्रीय चक्र आहे ते अखंड फिरते ठेवणे होय.निसर्गातील हवा,पाणी,वृक्ष-वनस्पती,जमीन,पशु-पक्षी आणि मानवप्राणी यांच्या पारस्परीक नात्यात जेव्हा नैसर्गिक समतोल असतो तेव्हा पर्यावरण संतुलित आहे असे म्हणतात.औद्योगिक क्रांतीनंतर मानवांच्या राहणीमानात व नित्याच्या गरजांमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्यामुळे मोठया प्रमाणावर निसर्गाचा असमतोल जाणवू लागला आहे.पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे आज आपणास दुष्काळ, पूर,चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक पण मानवनिर्मित आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे.

ज्या ठिकाणी विकासाला सुरुवात होते तेथे पर्यावरणाचा ऱ्हास अटळ आहे.त्यामुळे या दोन गोष्टींचा मेळ घालणे महत्त्वाचे असते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे युरोपातील काही देशात 60 च्या दशकात आम्लवर्षा झाली.तेव्हापासून पर्यावरणाच्या प्रश्नाची लोकांना जाणीव व्हायला लागली.1968 स्वीडनने संयुक्त राष्ट्रसंघाला पर्यावरणावर परिषद घेण्याची कल्पना सुचवली.त्यादृष्टीने 1972 साली संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी पर्यावरणावर स्टोकहोम येथे पहिली बैठक झाली.तेथूनच जागतिक पर्यावरण दिवस साजरे करण्यास सुरुवात झाली.'विनाशाखेरीज विकास'ही संकल्पना यातूनच पुढे आली.या परिषदेनंतर 70 च्या दशकात अनेक जागतिक परिषदा झाल्या यात प्रामुख्याने 1974 ला बुखारेस्टची 'विश्व जनसंख्या परिषद',1975 ची मॅक्सिकोमधील 'विश्व महिला परिषद',रोमची 'खाद्य परिषद',1976 साली कॅनडा मधील युनोची 'विस्थापितांची परिषद',1979 ला जिनिव्हामध्ये झालेली 'विश्व वातावरण परिषद'यांचा समावेश होतो.पर्यावरणाचे महत्त्व या सर्वांच्या अगोदर भारताला समजले होते.कारण भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश आहे ज्याने देशाच्या घटनेत पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे स्पष्ट केलेले आहे.हे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येकांनी ठरविले पाहिजे की मी विनाकारण वाहन वापरणार नाही,जास्तीत जास्त ecofriendly वस्तूंचा वापर करेल,प्लास्टिक वापर टाळण्यासाठी प्रयत्न करत राहील व इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहन देईल. प्रत्येकांनी एवढे केले तरी पर्यावरणासाठी हे मोलाचे योगदान ठरेल.नसता निसर्गच ठरवेल आपण आपल्या कर्तव्याला चुकलो,तर नाही ना?