साहित्याचे इतिहास लेखन

Old writing equipments on the table with some marathi text

मानवी जीवनाच्या वाटचालीत जगण्याची जशी धडपड आहे,तशीच दुसऱ्याला सुखावण्याची व स्वतःच्या मनाला तोषण्याची उर्मीदेखील आहे.साहित्य व कलेची अभिव्यक्ती ही कलाकारांच्या मनातल्या भावनांचा आविष्कार असते. कलेचा आविष्कार घेणाराही सुखावून जातो.सप्तस्वरांची सजावट गायकाबरोबर ऐकाणाऱ्यांचे कान तृप्त करते.एखादी कलाकृती दिसताक्षणीच पाहणाऱ्याला मोहवून टाकते.सारे मानवी जीवन अशा साहित्यिक अभिव्यक्तींनी आणि कलाविष्कारांनी समृद्ध आहे.गतकालीन इतिहासाच्या वाटचालीचा समग्र आलेख रेखाटताना या कलाविष्काराला आणि साहित्यिक अभिव्यक्तीला अनन्यसाधारण महत्व आले आहे.इतिहास लेखनाचा तर तो भाग बनला आहेच.परंतु स्वतंत्रपणे साहित्याचा व कलेचा इतिहासही रेखाटला गेला आहे.इतिहासलेखनप्रकारात यांचा इतिहासदेखील समाविष्ट होतो.

सामान्यतः साहित्याचा अभ्यास करणारा अभ्यासक हा वाङ्मयाचा इतिहासाचा मागोवा घेऊनच पुढे जातो.तसेच मानवी जीवनाची रूपरेषा रेखाटणारा इतिहासाचा अभ्यासकही साहित्य अभिव्यक्तीचा विचार करतोच.किंबहुना अभिव्यक्ती हा प्रकारही कालसापेक्ष असल्याने वाङ्मय व कलात्मक अभिव्यक्तीतूनही ज्या विशिष्ट काळात ही अभिव्यक्ती झालीय त्या काळातले प्रतिबिंब त्यात उमटलेले असतेच.म्हणून इतिहासाचा अभ्यासक यांचा निर्भेळ आनंद घेण्याबरोबरच त्या अभिव्यक्तीचा उपयोग तत्कालीन इतिहासाचे साधन म्हणून कितपत होतो याचाही आवर्जून विचार करतो.जगातील सर्व भाषांमधील साहित्याचा मागोवा घेणारे ग्रंथ रचले गेले आहेत.प्राचीन ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन साहित्याचा अभ्यास झाला आहे.प्राचीनतम भाषांपैकी संस्कृत,गोयथिक आणि केल्टीक भाषांतील साहित्याचा इतिहासही रेखाटल्या गेला.अलीकडच्या काळात विशेषतः सोळाव्या शतकानंतरच्या इंग्रजी साहित्याच्या क्षेत्रात सुवर्णयुग अवतरले. समृद्ध असे इंग्रजी साहित्य निर्माण झाले. सम्राज्ञी एलिझाबेथच्या कालखंडापासून म्हणजे शेक्सपिअरच्या वाङ्मयीन अभिव्यक्तीपासून इंग्रजी साहित्याच्या इतिहासाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला.

स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक साहित्यिकांनीही इंग्रजी भाषेतून साहित्यनिर्मिती केली.तात्पर्य,इंग्लिश साहित्याचा इतिहास रेखाटताना त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवलेला दिसतो.डच,स्पॅनिश,जर्मन,फ्रेंच व आधुनिक भाषांचेही व अभिव्यक्तीचे इतिहास लिहिले गेले,रेखाटले गेले.भारतातील प्राचीन भाषांमध्ये संस्कृत,तमिळ,तेलगू,कन्नड यांच्यातील साहित्याचे इतिहास लिहिले गेले आहेत. आधुनिक भाषांपैकी हिंदी,मराठी,गुजराती,सिंधी भाषांचे व साहित्याच्या इतिहासाचे ग्रंथही आज उपलब्ध आहेत.तात्पर्य,वाङ्मयीन इतिहास हा इति.लेखनप्रकारातला एक महत्त्वपूर्ण भाग होय.किंबहुना प्राचीन साहित्याच्या अभ्यासातूनच प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाचे दालन खुले झाले.मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाने भारतातील संस्कृत साहित्याचा इतिहास प्रथम शोधला.वेदवाङ्मयाचे भाषांतर जर्मन भाषेत केले.सर विल्यम जोन्स यांनी तर जगातील सर्व प्राचीन भाषांचा/साहित्याचा मागोवा घेतला.साहित्याच्या इतिहासलेखनाची परंपरा जगातल्या सर्वच देशांतून व सर्वच भाषांतून रूढ आहे.

साहित्याच्या इतिहासातूनच तत्कालीन समाजाच्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटलेले आढळते.साहित्याचा इतिहास जसा नाट्य,कथा,कादंबरी,काव्य यांच्या अविष्काराची नोंद करतो तसेच इतरही अनेक गोष्टीचा त्यात अंतर्भाव होतो.महानुभाव साहित्याचा आलेख रेखाटताना श्रीचक्रधरस्वामींच्या लीळाचरीत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते;तसेच स्थानपोथीतून व्यक्त होणारे समाजजीवनही लक्ष वेधून घेते.आधुनिक भाषांबरोबरच आता अनेक बोलीभाषांतील साहित्याचा इतिहासही रेखाटला जाऊ लागला आहे.कोंकणी,अहिराणी यांसारख्या भाषांतील साहित्याची नोंद घेणारे इतिहासही लिहिले जाऊ लागले आहेत.