विवेक हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थाने वापरल जातो.विवेक या मूळ संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ 'वेगळे करणे' असा आहे.हंस पक्ष्यासमोर दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यास तो दूध तेवढे शोषून घेतो आणि पाणी वेगळे करतो असे म्हणतात.हंसाच्या या क्षमतेला नीरक्षीर विवेक असे म्हणतात.जीवनात माणसाच्या वाट्यालाही खरे-खोटे,बरे-वाईट,टिकाऊ-क्षणभंगुर,सुखद-दुःखद अशा भिन्न स्वभावाच्या गोष्टी सरमिसळ स्वरूपात येत असतात.अशा वेळी त्या त्या भिन्न स्वभावाच्या गोष्टी वेगळ्या करणे आणि योग्य तेच निवडून अयोग्य टाकून देणे याला 'विवेक'(उदाहरणार्थ,नित्यानित्य-विवेक, सद्-असद्-विवेक)म्हंटले जाते.भौतिक ज्ञानापेक्षा अशा विवेकज्ञानाला अध्यात्मक्षेत्रात महत्व असते.'विवेकवाद'या शब्दातील अर्थ हा नाही.
विवेकवाद (Rationalism) या शब्दाचा दुसरा अर्थ पाश्चात्य तत्वज्ञानात मांडला गेला आहे.येथे विवेक याचा अर्थ 'बुद्धि' किंवा 'तर्कबुद्धी' असा आहे.म्हणूनच विवेकवादाचा अर्थ बुद्धिवाद किंवा तर्कबुद्धिवाद असा करता येईल.विवेकवाद ही मानवी ज्ञानाचे स्पष्टीकरण करणारी उपपत्ती आहे.येथे प्रश्न असा आहे-माणसाला या जगाचे जे यथार्थ ज्ञान होते ते कोणत्या साधनाने होते?याला उत्तर देण्याचा प्रयत्नात पाश्चात्य तत्वज्ञानात अनुभववाद आणि बुद्धिवाद अशा दोन उपपत्ती मांडल्या गेल्या आहेत.लॉक,बर्कले व ह्यूम हे अनुभववादी होते तर देकार्त,स्पिनोझा व लाईब्निझ हे बुद्धिवादी होते.अनुभववाद्यांच्या मते सर्व यथार्थ ज्ञानाचा मूलस्रोत पंचेंद्रियांनी येणारा अनुभव हा असतो तर बुद्धिवाद्यांच्या मते अनुभव बऱ्याचदा फसवा असल्याने त्यापासून यथार्थ ज्ञान होण्याची खात्री नाही.विश्वाचे खरे स्वरूप तर्कबुद्धिने(Reason)च आकलन होऊ शकते.अनुभवावर अवलंबून न राहता शुद्धबुद्धीने विश्वातील सत्यांचा उलगडा होऊ शकतो.या भूमिकेलाच पाश्चात्य देशात बुद्धिवाद किंवा विवेकवाद संबोधले जाते.
एक धर्मचिकित्सक विचारसरणी म्हणून विवेकवादाचा अर्थ
एक धर्मचिकित्सक दृष्टिकोन किंवा विचारसरणी या नात्याने विवेकवादाचा अर्थ वेगळा आहे.येथेही विवेक म्हणजे बुद्धी किंवा तर्कबुद्धी.त्यामुळे 'विवेकवाद'या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून बुद्धिप्रामाण्यवाद किंवा बुद्धिवाद असे शब्द वापरले जातात.
पण एक धर्मचिकित्सक दृष्टीकोन म्हणून आपण जेव्हा बुद्धिवादाचा विचार करतो तेव्हा बुद्धी-विरुद्ध-अनुभव असे द्वंद्व नसते तर बुद्धी-विरुद्ध-श्रद्धा असे द्वंद्व असते किंवा बुद्धिप्रामाण्य विरुद्ध शब्दप्रामाण्य असे द्वंद्व असते.एकूण जगाचे स्वरूप त्याचा जगाशी असलेला संबंध,मानवाचे खरे स्वरूप,काही चमत्कारवत् वाटणाऱ्या घटना व त्या घटनांचा अन्वयार्थ या साऱ्यांविषयी धर्मग्रंथातून काही दावे केलेले असतात,तसेच परंपरेने काही समजुती प्रचलित झालेल्या असतात,तर काही व्यक्ती आपल्याला अतींद्रिय ज्ञानाने सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत असा दावा करत असतात.अशा वेळी हे दावे स्वीकारायचे किंवा नाहीत?स्वीकारायचे असतील तर कोणत्या आधारावर?नाकारायचे असतील तर कोणत्या आधारावर?असे प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ,सूर्यग्रहण होते तेव्हा राहू नावाचा राक्षस सूर्याला गिळतो आणि सूर्य दिसेनासा होतो,अशी समजूत पूर्वी प्रचलित होती.ही समजूत स्वीकारायची का नाकारायचे?आणि कोणत्या आधारावर?असा प्रश्न श्रद्धावादी/शब्दप्रामाण्यवादी कोणते उत्तर देईल?तो पुढीलपैकी काहीतरी म्हणेल-
- ही समजूत बरोबर आहे कारण पुराणग्रंथात तसे म्हणून ठेवले आहे.
- आपल्या ऋषीमुनींना अंतज्ञानाने या गोष्टी कळल्या होत्या. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे.
- आकाशात जर राहू नावाचा राक्षस असेल तर उघडया डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून तो दिसू शकला पाहिजे.
- अशा राक्षसाचे अस्तित्व अनुमानाने सिद्ध झाले व त्याचा प्रत्यक्षाने पडताळा घेता आला तर ते स्वीकारता येईल,पण राहूचे अस्तित्व अनुमानाने सिद्ध होत नाही.
- सूर्यावर इतकी प्रखर उष्णता आहे की त्याच्या जवळ जाणारी कोणीही जिवंत व्यक्ती-पशु वा मानव किंवा तथाकथित दानव(?)जळून खाक होईल.मग त्याने सूर्याला गिळण्याची गोष्टच सोडा.त्यामुळे सूर्य झाकला जाणे हे बुद्धीला पटणारे नाही.
- ग्रहताऱ्यांच्या स्तिथीचे दुर्बिणीतून निरीक्षण करून व त्यांच्या गतीचे गणित मांडून शास्त्रज्ञांनी असे दाखविले आहे की सुर्यग्रहणाच्या वेळी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने चंद्राची सावली पृथ्वीवर पडते व त्या सावली आलेल्या भागातून सूर्य काही काळ दिसेनासा होतो.सुर्यग्रहनाचे हे स्पष्टीकरण प्रत्यक्ष निरीक्षण व तर्कबुद्धी यांवर अवलंबून असल्याने ते स्वीकारण्यायोग्य आहे.
अशा रितीने 'राहू सूर्याला गिळतो' हे सुर्यग्रहनाचे पौराणिक स्पष्टीकरण टाकून दिले पाहिजे व शास्त्रीय स्पष्टीकरण स्वीकारले पाहिजे असे विवेकवादी म्हणतो.विवेकवाद हा धार्मिक समजुतींचे परीक्षण करण्याविषयीचा एक महत्वाचा दृष्टिकोन आहे:विज्ञानाचे तात्विक समर्थन विवेकवादाद्वारे होऊ शकते,पण बुद्धिप्रामाण्यवाद ही परिपूर्ण विचारसरणी होऊ शकते का?विवेकवादाची वैज्ञानिक दृष्टिकोनाशी जवळीक असली तरी त्याला बऱ्याच मर्यादा आहे.